वेगवेगळ्या प्रकारच्या मोदकांनी वाढवा गणेशोत्सवाची रंगत
वाजत गाजत ढोल-ताश्याच्या गजरात गणपती बाप्पाचे आगमन झाले. गणपतीला प्रसन्न करण्यासाठी भक्त बाप्पाची भक्तिभावाने पूजा करतात, नैवैद्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवतात. बाप्पाचा प्रसाद म्हटला कि सर्वांसमोर मोदक येतात. बाप्पाचा आवडता नैवैद्य म्हणजे मोदक… दररोज गणपतीला मोदकांचा नैवैद्य दाखवला जातो. प्रत्येकाची मोदक बनवण्याची वेगळी पद्धत असते. चला तर मग आज जाणून घेऊ वेगवेगळे मोदक आणि ते बनवण्याच्या पद्धतीबद्दल…
शुगरफ्री मोदक
1) बिया नसलेले खजूर, नारळ, काजू आणि बदाम यांचे बारीक तुकडे करून घ्या.
2) १-२ मिनिटे काप केलेला सुका मेवा एक एक करून भाजून घ्या.
3)नारळाचे तुकडे तपकिरी रंगाचे होईपर्यंत भाजून बाजूला काढुन घ्या. त्याच कढईत खसखस फुटेपर्यंत भाजा.
4)कढईत तूप गरम करून त्यात खजूरचे तुकडे आणि मणुके घट्ट होईपर्यंत तळा. गॅस बंद करून ते मिश्रण थंड होऊ द्या.
5)पल्स मोडमध्ये भाजलेला सुका मेवा, खसखस, खोबरे खडबडीत पावडर मध्ये बारीक करा.
6)खजूर-मणुक्याच्या मिश्रणात बारीक केलेली पावडर एकत्र करून घ्या.
7)हे मिश्रण चिकट झाल्यावर मोदकाच्या साच्यात ठेऊन त्याचे मोदक तयार करा. हे मोदक हवाबंद डब्यात ठेवा.
बर्फी मोदक
1)तुपात काजूची पेस्ट परतवून घ्या.
2)त्यात खवा आणि दूध टाकून एकजीव होईपर्यंत परतवा.
3)नंतर त्यात साखर, केशर आणि सुका मेवा टाका.
4)मोदकाच्या साच्यात टाकून त्याला फ्रिजर मध्ये ठेवा.
5)शेवटी त्याला चांदीचा वर्ख, ड्रायफ्रुटस किंवा केशरने सजवा.
उकडीचे मोदक
1) तांदळाचे पीठ भिजवून घ्या.
2) एका कढईत गुळ, तूप आणि खोबरे गरम करून त्याचे मिश्रण तयार करा. त्यात वेलची पूड आणि आवडीनुसार सुकामेवा टाका.
3) तांदळाच्या पिठाचा छोटासा भाग घेऊन त्याची छोटी पोळी लाटून घ्या.
4) त्यावर मधोमध मोदकाचे मिश्रण टाकून त्याचा मोदक बनवा.
5) या मोदकांना १०-१२ मिनिटांसाठी वाफवून घ्या.
केसरी मोदक
1)उकळलेल्या पाण्यात एक चिमूट मीठ, तूप, केशर आणि तांदळाचे पीठ घाला.
2)१० मिनिटे ओल्या कपड्याने झाकून ठेवा.
3)स्टफिंग बनवण्यासाठी एका पॅनमध्ये किसलेले खोबरे, तूप आणि गुळ एकत्र करून त्यात वेलचीपूड, मणुके आणि भाजलेले काजू टाका.
4)पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्यात सारण भरून त्याचे मोदक तयार करा.
5)मोदक ओल्या कपड्याने झाकून ठेवा.
6)नंतर त्यांना मध्यम आचेवर १० मिनिटे वाफवून घ्या.
चॉकलेट मोदक (पद्धत १)
1) ग्लुकोज बिस्किटांची पावडर बनवून घ्या.
2) त्यात ड्रिंकिंग चॉकलेट पावडर, दूध आणि तूप टाका.
3) चॉकलेटच्या मिश्रणाचे गोळे बनवून त्यामध्ये सुकामेवा टाका.
4) मोदकाच्या साच्यात ते गोळे टाकून त्याचे मोदक तयार करा.
चॉकलेट मोदक (पद्धत २)
1) डार्क चॉकलेट तुपात वितळून घ्या.
2) दुसऱ्या बाउल मध्ये काजू, बदाम, पिस्ता आणि खवलेला नारळ एकत्र करावा.
3) यात कंडेन्सड मिल्क टाकून नीट मिक्स करून घ्या.
4) याच मिश्रणात चॉकलेट टाकून ते थोडे थंड करून घ्या.
5) नंतर मोदकाच्या साच्याने मोदक तयार करा.
पान मोदक
1) खायची पाने घ्या, त्याची देठ काढून लहान लहान तुकडे करा.
2) मिक्सर मध्ये कंडेन्सड मिल्क, पानाचे तुकडे आणि साखर टाकून त्याची बारीक पेस्ट करा.
3) पण मध्ये तूप टाकून त्यात नारळाचा खिस टाकून नीट भाजून घ्या.
4) त्यानंतर पण-साखरेची पेस्ट त्यामध्ये मिक्स करा आणि २ मिनिटे व्यवस्थित भाजून घ्या.
5) त्यानंतर गुलाबाच्या पाकळ्या आणि खायचा हिरव्या रंगाचे २ थेंब कलर टाका. हे मिश्रण नीट मिक्स करा.
6) चव वाढवण्यासाठी त्यात खिसलेलं खोबर, गुलकंद,टुटी-फ्रुटी आणि १ चमचा कंडेन्सड मिल्क टाका, हे मिश्रण नीट मिक्स करून घ्या.
7) मिश्रण थंड झाल्यानंतर मोदकाच्या साच्याने मोदक तयार करा.
मखाना मोदक
1) पॅनमध्ये मंद आचेवर मखाने भाजून घ्या. त्यांचा रंग बदलला कि त्यांना बाजूला काढून घ्या.
2) पॅनमध्ये १ चमचा तूप टाकून त्यात काजू आणि बदामाचे तुकडे परतवावे.
3) त्यानंतर त्यात नारळाचा खिस आणि पिस्ताचे तुकडे टाकून भाजून घ्या.
4) एका भांड्यात दूध उकळवा. तोपर्यंत भाजलेले मखाने मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.
5) १५-२० मिनिटांनंतर दुधात साखर मिसळून घ्या. आणि दुधाला निम्मे आटवा.
6) त्यानंतर मखान्याची पावडर आणि सुकामेवा दुधात मिक्स करा.
7) या मिश्रणात वेलची पूड टाकून हे मिश्रण जाडसर मळून घ्या.
8) मोदकाच्या साच्याने मोदक तयार करा.
खव्याचे मोदक
1) एका पॅन मध्ये खवा आणि साखर टाकून ते नीट मिसळून घ्या.
2) नंतर त्यात केसर टाका. हे मिश्रण व्यवस्थित घट्ट होईपर्यंत नीट शिजवा.
3) त्यात इलायची पावडर टाकून मिक्स करून घ्या.
4) मिश्रण थंड झाल्यानंतर मोदकाच्या साच्याने त्याचे मोदक तयार करा.
पौष्टिक मोदक
1)खजुराच्या बिया काढून ते हातानेच दाबून घ्या.
2)बदाम, काजू, मनुका, अक्रोड, पिस्ता या सुकामेव्याचे बारीक काप करून घ्या.
3)त्यात खजूर टाका. हे मिश्रण तूप टाकून हाताने चांगले मळून घ्या.
4)तयार झालेले सारण मोदकाच्या साच्यात टाकून त्याचे मोदक तयार करा.